Academics

Student Life

The rhythms beyond the classroom that shape every Dnyanprakash student — from music and sports to social work, festivals, and creative projects.

This article is currently available in Marathi only. An English version is forthcoming.

संगीत

बालभवनपासूनच ज्ञानप्रकाशच्या चारही विभागाची प्रार्थना सभा संगीतावर आधारित असते. पहिली व दुसरीची मुले आखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या संगीताच्या (गायन) दोन परीक्षांची तयारी प्रार्थना सभेतच करतात. गायन, वादन यातील आपल्या आवडीनुसार नंतर ज्ञानप्रकाश संगीत विद्यालयात पुढील परीक्षांची तयारी करतात. प्रकल्पातून मिळालेल्या प्रोत्साहनाने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमधून मुले सहभाग घेत आहेत.

म्हणूनच संगीत हा ज्ञानप्रकाशचा आत्मा आहे तर प्रयोगशीलता हा श्वास आहे असे मानले जाते.

क्रीडा

बालगटापासून चौथीपर्यंतची मुले वर्गातील बैठे खेळ तसेच वर्गाबाहेरील प्रांगणातही विविध खेळांचा आनंद घेतात. शाळेच्या मोठ्या मैदानावर जानेवारीत क्रीडा महोत्सव होतो. वर्गातील प्रत्येक मूल यात सहभागी असते.

योगासन, मल्लखांब, कबड्डी, खो-खो या भारतीय खेळांचे प्रशिक्षण प्रकल्पात दिले जाते. वैयक्तिक व सांघिक अनेक कौशल्यात्मक खेळातून मुले जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांतून सहभागी होऊन बक्षीसेही मिळवत आहेत.

वाचन संस्कार

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बालगटापासूनच सर्वच विभागात वयोगटांनुसार पुस्तके उपलब्ध आहेत. प्रार्थना सभेतून आणि वर्गातून ताई करत असलेल्या प्रकट वाचनामुळेही मुले पुस्तक घरातील पुस्तकांकडे आकर्षित होतात.

मोठी मुले ग्रंथालयातून पुस्तके घरी नेऊन वाचन करतात. वाचलेल्या पुस्तकाबद्दल वर्गातून किंवा प्रार्थना सभेतून त्यावर आपली मते मांडतात.

ज्ञानप्रकाशचे पालक आपल्या मुलांच्या तसेच आजी आजोबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तकांची भेट देतात. त्यातूनही ग्रंथालय अधिक समृद्ध होत आहे.

पालक सहभाग

मुलांच्या विकासात पालक आणि शाळा यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे ज्ञानप्रकाश मध्ये पालक हा महत्त्वाचा घटक मानला जातो.

प्रत्येक पालक मीटिंग ला (आई-बाबा) दोघांनीही उपस्थित राहून प्रकल्पाची भूमिका व वर्षभरातील नियोजन समजून घेणे महत्त्वाचे असते.

बदलत्या काळातील पालकत्वाचा प्रवास सुकर व्हावा यासाठी विविध कार्यशाळा, व्याख्याने, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि पालकांसाठीच्या स्पर्धांचे नियोजन संस्था करते. यात पालकांचा आणि पालक समिती सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो.

आनंदनगरी

मुलांना पैशांचे व्यवहार समजावेत. यासाठी इयत्ता ४थी व ५वी ची मुले आनंद नगरीचे आयोजन करतात. यात खरेदी-विक्री, नफा-तोटा यासारख्या गणितीय संकल्पनांचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेता यावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. पालकांच्या मदतीने विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल मांडून मुले विक्री करतात. विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पालक सहकुटुंब येतात. लहान मुले आनंदनगरीतून तर मोठी मुले प्रकल्पात तयार झालेला गांडूळ खत, स्वतः तयार केलेली रोपे व आकर्षक वस्तू, पुस्तक प्रदर्शनातील पुस्तके यांची विक्री करतात. मिळालेल्या नफ्यातून मुलांनी प्रकल्पास उपयोगी अशा अनेक भेट वस्तू दिल्या आहेत.

सहल

परिसरातील तसेच जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक व औद्योगिक स्थळांची माहिती व्हावी या हेतूने वयोगटानुसार सहलींचे आयोजन केले जाते. यात विविध प्रकारच्या वाहनातून मुले प्रवासाचा आनंद लुटतात.

१ली ते ४थी वर्गांची सहल दिवसभराची असते. सर्वच मुलांचा सहभाग असावा यासाठी बालगटापासून चौथीपर्यंतच्या मुलांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मोठ्या मुलांची सहल ३-४ दिवसांची असते. यातही सर्वांना सहभाग घेता यावा यासाठी ती अधिक खर्चिक होऊ नये असाच प्रयत्न असतो. ३ ते ४ दिवसांच्या सहलीत मुले विविध ऐतिहासिक व सामाजिक प्रकल्पांना भेटी देतात. ९वी १०वी ची मुले जंगल सफारी, ट्रेकिंग करतात. यात पाय वाटेने डोंगर चढणे, अंधाऱ्या रात्री पायी प्रवास करणे. यातून विद्यार्थ्यांमध्ये साहस व इतिहास घडविणाऱ्यांबद्दल अभिमान व आदरभाव निर्माण होतो. काही वेळा मुलांच्या सहलीत पालकांचाही सहभाग घेतला जातो.

सामाजिक उपक्रम

शाळेच्या परिसराशी आणि पर्यायाने समाजाशी मुले जोडली जावीत या हेतूने अनेक सामाजिक उपक्रमांचे नियोजन केले जाते. यात मतदान जनजागृती, कचरा व जलव्यवस्थापन, कॅरीबॅग निर्मूलन, जलपुनर्भरण, ज्येष्ठांशी संवाद याबरोबर सेवाभावी संस्थांसाठी निधी संकलनही केले जाते. यामुळे संवेदनशीलता आणि समाजभान निर्माण होण्यास मदत होत.

सृजनानंद महोत्सव

मुलांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला कृतीशीलतेची जोड मिळावी. यासाठी मागील 26 वर्षांपासून सृजनानंद महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी वयोगटानुसार प्रकल्प विषय सुचविले जातात. लहान मुले पालकांच्या मदतीने तर मोठी मुले स्वतः यावर काम करतात. मुलांनी अनेक समाज उपयोगी, पर्यावरण पूरक, कौशल्याधारित अनेक विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी मुलांनी केली आहे.

सण-उत्सव

आपल्या देशाची कृषीप्रधानता लक्षात यावी, सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच मुलांच्या अंतरिक विचारांना योग्य दिशा मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा हा सण-उत्सव साजरे करण्यामागील मुख्य उद्देश असतो.

आपल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणारे काही सण-उत्सव प्रकल्पात साजरे होतात.

गणेशोत्सव कालावधीतच चराचरातील सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्व मुले एकत्रित भोजनाचा आनंद घेतात. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता १० वी ची मुले करतात.

इतर स्पर्धा

मुलांचा आत्मविश्वास वाढावा, नवनवीन कौशल्ये विकसित व्हावीत, स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी यासाठी वर्गा वर्गातून विविध स्पर्धा घेतल्या जातात.

यातून सहकार्य वृत्ती, टीमवर्क आणि वेळेचे व्यवस्थापन शिकण्यास मदत होते.

यातूनच पुढे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नृत्य, गीत गायन, बालनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमधून मुले बक्षीसे मिळवत आहेत.

स्नेहसंमेलन

प्रकल्पातील प्रत्येक मूल स्नेहसंमेलनात सहभागी असते. मुलांच्या वयोगटाचा विचार करून जाणीवपूर्वक वैविध्यपूर्ण विषय निवडले जातात. विविध गाणी निवडणे, नाट्यसंवाद लिहिणे, सूत्रसंचालन लिहिणे व करणे अशा अनेक गोष्टी मुले शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात. स्नेहसंमेलनातील मुलांचा सहभाग पालकांसाठी अधिक खर्चिक होऊ नये याचाही संस्था विचार करते. स्नेहसंमेलनातून मुलांचे सामूहिक सादरीकरण होते. तर विविध गुणदर्शनातून वैयक्तिक सादरीकरणाची संधी असते. यात कथाकथन, नाट्यछटा, नकला, नृत्य, काव्यवाचन, गीत गायन, वादन, अशा कला प्रकाराची निवड करून सादरीकरण करता येते.